आजरा (प्रतिनिधी - गोपाळ गडकरी):
कोल्हापूर जिल्हा पोलीस दल, आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित सन २०२६ च्या गणेशोत्सवातील 'गणराया अवॉर्ड' स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. आजरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत धामणे येथील फ्रेंडशिप मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गंगामाई वाचन मंदिरचे अध्यक्ष वामन सामंत यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना ते म्हणाले की, "गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सवही डॉल्बीमुक्त होतोय, ही कौतुकास्पद बाब आहे. आजरा पोलीस यंत्रणेने एकही सुट्टी न घेता चोख कर्तव्य बजावले. तहसील प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन, महावितरणने अखंडित वीजपुरवठा, नगरपंचायतीने स्वच्छता आणि आरोग्य विभागाने शिबिरे राबवून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. तालुक्यातील गणेश मंडळांनीही डॉल्बीला फाटा देत शांततेत उत्सव साजरा करून प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले."
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गणराया अवॉर्ड स्पर्धा निकाल:
प्रथम क्रमांक: फ्रेंडशिप मित्र मंडळ (धामणे)
द्वितीय क्रमांक: शिवसेना प्रणित जयशिवराय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
तृतीय क्रमांक: लिंगायत गल्ली मंडळ
उत्तेजनार्थ: अवधूत तरुण मंडळ (उत्तूर)
'एक गाव एक गणपती' स्पर्धा निकाल:
प्रथम क्रमांक: नवक्रांती मंडळ (सरोळी)
द्वितीय क्रमांक: हनुमान मंडळ (झुलपेवाडी)
तृतीय क्रमांक: राजा शिवाजी मंडळ (मलिग्रे)
उत्तेजनार्थ: न्यू जयशिवराय मंडळ (विटे)
या सोहळ्यात क्रेन मालकांचा तसेच डॉल्बीमुक्त उत्सवासाठी तालुक्यातील ६३ गावांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून चोख कामगिरी बजावल्याबद्दल वामन सामंत, आरोग्य सेवक युनूस सैय्यद, अमित गुरव आणि ॲड. सचिन इंजल यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
शांततेत व पारंपरिक वाद्यांच्या गजरात नवरात्रोत्सव साजरा करा: सपोनि बाबासाहेब सरवदे
मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे म्हणाले, "सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा शांततेत सण साजरा केला आहे. त्याच धर्तीवर आगामी नवरात्रोत्सवातही डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा करावा. सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट टाळल्या पाहिजेत. प्रशासनाने दिलेल्या वेळेतच मिरवणुका पूर्ण कराव्यात, मंडपांत स्वयंसेवक व शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे."
नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश शेटे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता कृष्णा कोळी, पाटबंधारे विभागाचे अभियंता यांच्यासह वर्षा बागडी, अर्चना होलम, माधुरी पाचवडेकर, नगरसेवक अनिकेत चराटी, महावितरणचे संतोष डोंगरे, नगरपंचायतीचे प्रदीप नाईक, अबूसईद माणगावकर, शरीफ खेडेकर, महेश पाटील, आनंदा फडके, इस्माईल सोनेखान, विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.