सारथी महाराष्ट्राचा ई-पेपर
शैक्षणिक

पंडित दीनदयाळ विद्यालयात 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' उत्साहात साजरा

Admin Sarthi Maharashtracha • 01 October 2026, 01:12 PM

विशेष प्रतिनिधी - गोपाळ गडकरी,

येथील पंडित दीनदयाळ विद्यालयात १ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' मोठ्या उत्साहात आणि आदरपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील व कुटुंबातील वृद्ध व्यक्तींच्या अमूल्य योगदानाचा गौरव करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे विद्यालयाच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. वाय. देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "धावत्या युगात ज्येष्ठांकडे दुर्लक्ष न करता त्यांना प्रेमाचे दोन शब्द, थोडा वेळ आणि आपली सोबत देणे अत्यंत गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे."

​शिक्षक पी. जी. प्रभू यांनी, "आजी-आजोबा म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ असून ते कुटुंबाचे व समाजाचे अनुभवसंपन्न आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करणे ही केवळ जबाबदारी नसून आपली सुंदर संस्कृती आहे," असे विचार मांडले. तर शिक्षक ए. एन. पाटील यांनी आजी-आजोबा हेच आपले पहिले गुरू असून त्यांच्या गोष्टी आणि अनुभव हीच आपल्या जीवनाची खरी शिदोरी असल्याचे सांगितले.

​कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक शिवाजी बिरजे गुरुजी यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विभक्त कुटुंबपद्धतीवर प्रकाश टाकला. लहान झालेल्या कुटुंबांमध्येही ज्येष्ठांना योग्य मानसन्मान दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. दुसरे ज्येष्ठ नागरिक आक्रम नेसरीकर यांनी विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन देशाचे सुजाण व जबाबदार नागरिक बनावे, अशी प्रेरणा दिली.

​या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन एस. ए. निर्मळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एस. पी. कांबळे यांनी मानले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)