सारथी महाराष्ट्राचा ई-पेपर
महाराष्ट्र

प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक या प्रतिष्ठेच्या पुरस्कार’साठी निवड

Admin Sarthi Maharashtracha • 01 October 2026, 11:59 AM

आजरा : गोपाळ गडकरी,                                            राज्यस्तरावर

पर्यावरण सेवा योजना, आपत्ती व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, व्यसनमुक्त जाणीव जागृती यासारख्या विधायक कार्यात राज्यस्तरावर विषयतज्ञ व मार्गदर्शक म्हणून सहभाग घेऊन

विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आजरा महाविद्यालय, आजरा येथील प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

राजे समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी प्रा. शिंत्रे यांची निवड झाल्याचे निवडपत्राद्वारे कळविण्यात आले आहे. दि. २८ जुलै २०२६ रोजी देण्यात आलेल्या निवड पत्रात त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणविषयक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला आहे.

प्रा. शिंत्रे यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, व्यसनमुक्ती, मतदार जनजागृती, ऊर्जा संवर्धन, बांबू संवर्धन व विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे निवडपत्रात नमूद करण्यात आले आहे.

समाजात वाढल्यानंतर समाजाला काहीतरी देणे लागते, या जाणिवेतून सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींमध्ये प्रा. शिंत्रे यांचा समावेश असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले असून, पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

परंपरेनुसार लवकरच कागल येथे दिमाखदार राजेशाही सोहळ्यात पुरस्कार वितरण होणार आहे..

प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांच्या या निवडीबद्दल शिक्षण, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)