विशेष प्रतिनिधी: गोपाळ गडकरी
समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना आळा घालणे, ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांची काळजी घेणे आणि सध्या मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या मोबाईल अरेस्ट (डिजिटल अरेस्ट), सायबर फसवणूक व आर्थिक लुटीबाबत सजगता निर्माण करणे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष प्रबोधनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. हा सत्कार महासंघाचे तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस प्रशासनाने सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या क्लृप्त्या उघड केल्या. "डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना भीती दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची लूट केली जाते. अशा कोणत्याही संशयास्पद कॉल्स अथवा धमक्यांना ज्येष्ठ नागरिकांनी अजिबात घाबरू नये, तातडीने कुटुंबीय आणि पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गावातील व परिसरातील एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांच्या नियमित संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असा सूर मान्यवरांनी लावून धरला.
या सोहळ्यास मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, उपजिल्हाध्यक्ष सी. आर. देसाई, आजरा तालुकाध्यक्ष शंकरराव शिंदे, कार्याध्यक्ष शिवाजीराव पाटील, सचिव संभाजीराव इंजल यांच्यासह प्रकाशराव देसाई, पावले सर, सी. डी. देसाई, राजू सावंत, सूर्यकांत आजगेकर, भाऊ निर्मळे, दत्ताजीराव मोहिते, महादेव पवार, शिवाजीराव इंजल आणि महासंघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.