आजरा: प्रतिनिधी,
येथील आजरा महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने ‘नॅक रीफॉर्म- २०२४’ या विषयावर नुकतीच एकदिवसीय विशेष कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. नॅक मूल्यांकनाची नवीन सुधारित कार्यपद्धती, गुणवत्ता निकष आणि मानांकन प्रक्रियेतील बदलांविषयी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून दि न्यू कॉलेज, कोल्हापूरचे नॅक समन्वयक प्रा. डॉ. निलेश पवार उपस्थित होते. त्यांनी नॅक रीफॉर्म- २०२४ अंतर्गत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकत सुधारित दहा विभाग, नवीन गुणदान पद्धती, आवश्यक कागदपत्रे, अचूक डेटा संकलन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी उपयोग आणि सादरीकरणाच्या पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. "नॅक मानांकन ही केवळ गुणांकनाची प्रक्रिया नसून महाविद्यालयातील शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्ता सातत्याने उंचावण्याची संधी आहे," असे नमूद करत त्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमाचा अहवाल व व्हिडिओ अधिकृत संकेतस्थळावर वेळेत अपलोड करण्याचे आवाहन केले. उपस्थित प्राध्यापकांनी विविध प्रश्न विचारून चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. के. जी. पोतदार म्हणाले, "नॅकच्या नवीन कार्यपद्धतीनुसार प्राध्यापकांनी आतापासूनच पद्धतशीर तयारी सुरू करावी. या कार्यशाळेमुळे मिळालेल्या मार्गदर्शनाचा आगामी नॅक प्रक्रियेत महाविद्यालयाला नक्कीच मोठा फायदा होईल."
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. एस. कर्पे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बी. एम. मोहिते यांनी करून दिला. प्रा. डॉ. एम. आर. ठोंबरे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी तांत्रिक साहाय्य प्रा. एस. के. जाधव व डॉ. एस. पी. गजरे यांनी केले.
या कार्यशाळेस कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, समन्वयक प्रा. एस. बी. सावंत यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासकीय वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या आयक्यूएसी (IQAC) विभागाचे कौतुक होत आहे.